'पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्याचे बळ दे...'; वारकऱ्यांनी घेतला पंढरीचा निरोप
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळे भरुन अनुभवत परंपरने घराण्यातून चालत आली. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ भगवान की जय ।।। असा जयघोष करत येथील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारात तसेच महाव्दारात उभे राहून दोन्ही हातांनी स्वतःचे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारत सावळ्या परब्रम्हाकड क्षमा याचना करुन काही चुकले असेल तर माफी कर, पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे असे म्हणत त्याचा निरोप घेत होते.
यावेळी एकीकडे वारी पोहचल्याचा आनंद तर दुसरीकडे निरोप घेताना झालेली त्यांची अवस्था त्यांच्या डोळ्या खालील पापण्याच्या ओलाव्या वरुन स्पष्ट जाणवत होती. वारी पोहच केली. विठुरायाच्या भेटीला पुढच्या वर्षी येण्याची मनोमन इच्छा व्यक्त करून मोठ्या जड अंतकरणाने पंढरीचा आज निरोप घेत दमण येथील बस तसेच रेल्वे स्थानकावर पहाटेपासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी मोठी गर्दी होती. यावर्षी पावसाने संपूर्ण राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. याचा परिणाम यंदाच्या कर्तिक यात्रेवर झाला.
कार्तिकी यात्रेमध्ये वारकऱ्यांची संख्या खूपच कमी जाणवली. त्यामुळे एकंदरीतच व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला. वारी फेल गेल्यामुळे स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत होते. दरम्यान, पहाटेपासूनच भाविकांची परतीच्या प्रवासासाठी लगबग होती. येथील चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची मध्यरात्रीपासूनच स्नानासाठी गर्दी होती. चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि नगरप्रदक्षिणा करुन व्दादशीच्या न्याहारीची वारकऱ्यांची लगबग सुरु होती.
अनेक मठ, धर्मशाळांमधून वारकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्ती बसत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत होते. क्षीरापतीचे अभंग गायन करत पंगतीचा लाभ घेतला जात होता. वारकरी व्दादशी सोडून सामानाची बांधाबांध करुन मुक्कामाच्या ठिकाणाह्न बाहेर पडत थेट विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन घेऊन रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहनांमधून जातो माघारी पंढरीनाथा।






