गर्भलिंगचाचणी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार मोठं बक्षीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
गर्भलिंग विरोधात राज्य सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर आले आहेत. गर्भलिंग करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली असून गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना आता एक लाख रुपये बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत. तर या प्रकरणात धाडसाने समोर येणाऱ्या पिढीत महिलेला देखील एक लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
पीसीपीएनडीटी हा अॅक्ट प्रभावीपणे राबवणार असल्याचं सांगत येत्या काही दिवसात याबाबतचा अध्यादेश जारी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोल्हापुरात ते बोलत होते.
गर्भलिंग निदान विरोधात राज्यातील सर्वच पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या पंधरा दिवसात त्याबाबत कारवाई दिसेल. या कायद्याला अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे. नुकतीच आरोग्यविभागाची (Health) एक बैठक झाली आहे. ज्या सामाजिक संस्था यांना या प्रक्रियेत सामावून घेणे, पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यभरातील सर्व सामाजिक संस्था या प्रकरणात कार्यान्वित होतील. भरारी पथकाकडून अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणेतील लोक दबाव टाकत असतील तर चौकशी करून त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात आज लोकप्रतिनिधी सोबत अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. 31 मार्चपर्यंत उर्वरित निधी खर्च करण्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. येणाऱ्या सात तारखेच्या बैठकीत जिल्ह्यासाठी निधी आणण्याची मागणी करणार असल्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली.
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. या सर्व कामाला आता गती येणार असल्याचे सांगत शाहुवाडी तालुक्यातील झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड संदर्भात मी कायदेशीर गोष्टीच समर्थन करणार नाही. पालकमंत्री म्हणून कुठेही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी चालणार नाहीत. जे योग्य आणि कायदेशीर असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ती कामे केली जातील. जे बेकायदेशीर आहे. त्यावर कडक कारवाई केली जाईल, इतर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लवकरच दिले जातील, असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.