मुंबई : उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नगरसेवक महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसात बसून टक्केवारीचे राजकारण करत होते. तसेच, शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. महापालिकेवर प्रशासक आहे; मात्र, नगरसेवकांचे नगरसेवकपद राहिलेले नाही. असे असतानाही कार्यालयात बसून टक्केवारीचे काम केले जात होते. त्यामुळे ते मोडून काढण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील लावण्यात आले. त्यामुळे टक्केवारीचा धंदा बंद होईल, असा दावा रवी राणा (Ravi Rana) यांनी केला.
येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. तसेच, उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनाच शिंदे यांना चावी द्यावी लागणार आहे, असेही राणा म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. ते सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा विचार अंगीकारून बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा खरा शिवसैनिक बाहेर आला आहे, असेही राणा यांनी सांगितले.
शिवसेना भवन हे पक्षाच्या नावाने आहे. जेव्हा पक्षाचे बहुमत ज्याकडे असते त्याच्याकडे पक्षाचा ताबा मिळतो. शिंदे यांच्याकडे ८० ते ९० टक्के पक्ष आहे. ४० आमदार शिंदे गटात असून अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांना शिवसेना भवन मिळण्यात काहीच अडचण नाही, असा दावाही त्यांनी केला. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून येतील. ८० ते ९० टक्के माजी नगरसेवक शिंदेकडे येतील आणि शिंदेंचा झेंडा महापालिकेवर फडकेल, असेही भाकित राणा यांनी केले आहे.
शिवसेना भवनावर दावा करण्याचे विधान नाही
दादरचे शिवसेना भवन ताब्यात घेण्याचे आमच्या डोक्यात नाही. विचारात नाही आणि मनातही नाही. आम्ही कधी तो विषयही काढला नाही. आमच्या बैठकीत ठरले की दुसरे कार्यालय तयार करायचे. आमच्या बैठकीत कधी शिवसेना भवनचा विषय निघत नाही. आम्ही कधीच त्यावर ब्र शब्दही काढला नाही. आमच्या कुणाच्या तोंडून शिवसेना भवनावर दावा करण्याचे विधान निघाले असेल तर सांगा, असे आव्हानच भरत गोगावले यांनी दिले. आमच्या बापांमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही तयार झालो. खऱ्या बापाचे होतो म्हणून तुम्हाला हिसका दाखवला. आमच्या नादी कुणी लागू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाद तर कोणी करायचाच नाही, असा इशारा गोगावले यांनी दिला.
कोणत्या कायद्याने पक्ष कार्यालये सील केली; संजय राऊतांचा सवाल
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे बहुमत आहे. सगळ्या पक्ष कार्यालयांना कोणत्या कायद्याने सील लावण्यात आले, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोर घुसतात, त्यानंतर पालिका प्रशासन टाळे लावते, हे सगळे कुणाच्या आदेशाने चालल आहे, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. ठोकशाहीच्या बाबत ठाकरे गटाशी स्पर्धा करु नका, असा इशाराही राऊत यांनी दिला.