उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले
मुंबई : राज्यात मार्चअखेरीस उन्हाचा तडाखा तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मार्चमध्ये २.५ लाखांहून अधिक रुग्णांनी शासकीय यंत्रणेत उपचार घेतल्याची नोंद झाली आहे. उष्णतेशी संबंधित तक्रारी वाढत असताना उष्माघाताच्या घटनांचीही सुरुवात झाली आहे.
अहवालानुसार, राज्यभरात एकूण २५०८३२ रुग्ण नोंदवले गेले. यामध्ये प्रौढ रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक (२.२८ लाख) असून, बालरुग्णांची संख्या २२ हजारांपेक्षा अधिक आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकट्याच ५१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल ठाणे (४५ हजार), पालघर (३३ हजार), पुणे (२३ हजार) आणि नागपूर (२२ हजार) या जिल्ह्यांतही मोठी संख्या दिसून आली. यावरून शहरी भागात उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होते.
हेदेखील वाचा : Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी
२४ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यात उष्माघाताच्या किमान पाच घटना नोंदवण्यात आल्या आहेत. जळगाव, नाशिक, पालघर आणि रायगड येथे उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूची नोंद नसली तरी या घटना पुढील धोक्याचा इशारा मानल्या जात आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळीही आर्द्रतेचे प्रमाण 85 टक्के
अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी किमान तापमान २५ अंशांच्या पुढे गेले असून, सकाळीही आर्द्रतेचे प्रमाण ८५ ते १०० टक्क्यांदरम्यान आहे. उष्णता आणि आर्द्रतेचा दुहेरी परिणाम शरीरावर ताण वाढवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे.
रत्नागिरीत उन्हाची तीव्रता अधिक
रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळेउष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांना उष्माघात प्रतिबंध व उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






