Hinjawadi Metro News: हिंजवडी मेट्रो धावण्यासाठी सज्ज!; CMRS ची हिरवी कंदील, १५ ऑगस्टला उद्घाटन
हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या १२ स्थानकांचा (माण ते बालेवाडी) टप्पा सर्व तांत्रिक व सुरक्षेच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून तयार झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सीएमआरएसची कडक तपासणी पूर्ण झाली असून, तिला मंजुरी मिळाली आहे.
पुण्यातील यापूर्वीच्या मेट्रो टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या प्रमुख नेतृत्वाखाली अतिशय दिमाखात झाले आहे. याच परंपरेला अनुसरून हिंजवडी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनहीं एका मोठ्या सोहळ्याद्वारे नागरिकांच्या स्वाधीन करण्याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे मेट्रोच्या संदर्भातील सर्व आवश्यक फायली आणि औपचारिक प्रक्रिया पाठवण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांना ही विशेष भेट देण्यासाठी प्रशासन सूक्ष्म स्तरावर नियोजन करत आहे.
प्रवासी सुरक्षितता प्रथमः सीएमआरएस मंजुरीमुळे मेट्रोच्या सुरक्षेवर शिक्कामोर्तब.
आयटी क्षेत्राला दिलासाः हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या लवकरव सुटणार.
स्वातंत्र्यदिनाची भेटः १५ ऑगस्ट रोजी सेवेत दाखल करण्याचे प्रशासनाचे वेगाने प्रयत्न.
हिंजवडी मेट्रो सुरू झाल्यामुळे दररोज आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती मिळणार आहे. इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणमुक्त प्रवास अशा अनेक दृष्टीने ही मेट्रो पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात एक नवा अध्याय लिहिणार आहे. प्रशासनाकडून लवकरच उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल, ज्यामुळे पुणेकरांचा मेट्रो प्रवासाचा स्वप्नपूर्तीचा क्षण अत्यंत जवळ आला आहे.






