Hundreds Of Complaints Will Be Investigated Voters Had To Return Without Voting In Sollapur Nrdm
साेलापूरमध्ये मतदान न करताच नागरिकांना परतावं लागलं, शेकडो तक्रारींची आता होणार चौकशी
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती.
सोलापूर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती. दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते, पण मतदार यादीत नावेच नव्हती. अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना मतदान करता आले नाही. आता या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्ती केली जाणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात २० लाख ३० हजार ११९ तर माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९१ हजार ४५४ मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा किमान ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, असा विश्वास प्रशासनाला होता. गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. मतदानावर बहिष्कार घातलेल्या गावांमध्येही मतदान झाले. मात्र, मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना रिकाम्या पावलानं मतदान न करताच परतावे लागले. त्यासंदर्भात संबंधित तालुक्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार प्राप्त झाल्या आहेत.
मतदार यादीतील गंभीर बाबी म्हणजे जिवंत मतदारांची नावे मयत म्हणून यादीत होती. तर मयत व्यक्ती जिवंत आहेत म्हणून त्यांच्या नोंदी होत्या. अनेकांनी मागील निवडणुकांमध्ये नियमित मतदान केलेले असतानाही त्यांची नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत सापडलीच नाहीत. या गंभीर तक्रारींची आता पडताळणी होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी होईल, त्यात कोणत्या बीएलओंची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
[blockquote content=”बीएलओंच्या माध्यमातून मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यात स्थलांतर केलेले, मयत झालेले व मूळ त्या पत्त्यावर राहात नसलेले मतदार कमी झाले. पण, मतदार यादीत नाव नाही किंवा जिवंत असूनही मयतमध्ये नाव असल्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने त्या तक्रारींची पडताळणी केली जाईल.” pic=”” name=”- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर”]
मतदार यादीतील नेमकी चूक कोणाची?
जिल्ह्यातील तीन हजार ५९९ बीलओंच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्यात आली. बीएलओंनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मयत मतदारांची नावे कमी केल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वी केला होता. दुबार मतदारांची नावे देखील काढून टाकल्याचे सांगण्यात आले. परंतु, मतदानावेळी हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. काहींची नावे चुकून डिलीट झाली तर काहींची नावे स्थलांतरित म्हणून यादीत नव्हती. यात आता नेमकी चूक बीएलओंची की माहिती देणाऱ्या मतदारांची हे तक्रारींच्या चौकशीतून समोर येणार आहे.
Web Title: Hundreds of complaints will be investigated voters had to return without voting in sollapur nrdm