Photo Credit- Social Media संतोष देशमुखांच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेने थेट बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला
बीड: बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या जबाबांमधून कराड, चाटे आणि घुले टोळीच्या दहशतीचा विस्तृत खुलासा झाला आहे. तसेच, हत्येच्या कटासंबंधीची सखोल माहिती मिळाली असून, तपासासाठी हे जबाब निर्णायक ठरणार आहेत.
देशमुख यांच्या हत्येचा कट नेमका कसा, कुठे आणि कधी रचला गेला, यासंदर्भात या जबाबांमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवाय, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीची दहशत कशा प्रकारे पसरलेली आहे, हेही यातून स्पष्ट झाले आहे. तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी आपल्या जबाबांमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्यांच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करत असताना गोपनीय साक्षीदार उपस्थित होता. त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेला संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला.
विष्णू चाटे: “आम्ही पैसे कमावतो, आणि तुम्ही मात्र सर्व नासवता. ना स्वतःची प्रतिष्ठा राखली, ना आमची. तुला प्लांट बंद करायला सांगितले होते, पण तू काही करू शकला नाहीस. उलट, रिकाम्या हाताने परत आलास!”
सुदर्शन घुले: “आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो, पण संतोष देशमुख आडवा आला. त्याने आम्हाला थांबवले आणि मस्साजोग गावातील लोकांनीही आम्हाला हाकलून दिले.”
विष्णू चाटे: “वाल्मिक अण्णांचा स्पष्ट आदेश आहे—काम थांबले नाही, खंडणी मिळाली नाही, आणि जर संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा. बाकीच्यांनाही समजेल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर काय परिणाम होतो!”
सुदर्शन घुले: “यावेळी मी कंपनी बंद करण्यासाठी पक्की व्यवस्था करतो. कोणीही आडवा येणार नाही!”
हा जबाब गोपनीय साक्षीदाराने तपास अधिकाऱ्यांना दिला आहे.
6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीत झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर, मी संतोष देशमुख यांना फोन करून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, “सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत!” त्याचवेळी, वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांकडून वारंवार खंडणी मागितली जात असल्याचे मी निदर्शनास आणले होते. यापूर्वी मलाही वाल्मिक कराडने धमकी दिली होती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवले होते.
वाल्मिक कराडने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. या टोळ्यांच्या मदतीने तो विविध कंपन्यांकडून खंडणी वसूल करतो.
वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी झालेली आंदोलने त्याच्या टोळीतील गुंडांनीच आयोजित केली होती.
या साक्षीदाराने सांगितले की, बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याला विनाकारण अडकवण्यात आले. परिणामी, त्याला 90 दिवस बीड जिल्हा कारागृहात राहावे लागले.
प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही सुदर्शन घुलेला भाऊ मानायचे आणि त्याला ‘भाऊ’ म्हणून हाक मारायचे.