महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो- ai gemini)
महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू
दोन ते तीन दिवसांत राज्याच्या उर्वरित भागात दाखल होणार
कोकण-गोव्यात तुरळक पावसाचा अंदाज
सुनयना सोनवणे / पुणे: नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रातील वाटचाल वेगाने सुरू ठेवत मंगळवारी (ता.२३) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील आणखी काही भाग व्यापले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, मान्सूनने डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि वर्ध्यापर्यंत प्रगती केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या उर्वरित भागातही त्याची आगेकूच होण्याची शक्यता आहे.
आजपासून पुढील सहा दिवस कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी (ता. २४) रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम तसेच २४ जूनपासून गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने तेथे ‘उष्णतेसाठी यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसरात पुढील सात दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शहरातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. बुधवारी कमाल तापमान ३० अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून गुरुवारनंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.






