अहमदनगर : राहुरी येथे विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बेकायदशीररित्या जवळ बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले (Ahmednagar Crime) आहे. नवनाथ साहेबराव गोर्डे (वय ३४, रा. पोहेगांव, ता. कोपरगांव), समाधान बाबासाहेब चव्हाण (वय २५, रा. कोपरगांव बेट, ता. कोपरगांव) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक संतोष लोढे, विजय ठोंबरे, सागर ससाणे व रोहित येमुलं यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, एलसीबीचे अनिल कटके यांना दोनजण गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. कटके यांनी राहुरी परिसरात अवैध धंद्यावर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे एलसीबी पथकाने दोन पंचासह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून थांबलेले असताना थोड्याच वेळात दोनजण संशयितरित्या आजुबाजूला टेहळणी करीत पायी येताना दिसले.
पोलिस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांना पोलीस असल्याची ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता सांगितला. पथकाने त्याची अंगझडती घेतली असता नवनाथ गोर्डे याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असे एकूण ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.