महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेची काम करण्याची धमक - आमदार प्रशांत ठाकूर
किरण बाथम /रायगड :– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने दोन्ही गटातील आमदारांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या आमदाराने विरोधकांवर सणसणीत शब्दात टीका आहे.
पनवेल विधानसभा मतदारा संघाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकूर म्हणाले की,आम्ही काम करण्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे जो शब्द तुम्हाला देणार तो पुर्ण करून पुन्हा तुमच्या समोर येऊ अशी ग्वाही देतो. ठाकूर पुढे असंही म्हणाले की, आरोप अनेक जण करु शकतात मात्र जनतेची काम करण्याची धमक लागते, ती धमक महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
हेही वाचा- कोकणात डमी उमेदवारांचा सुळसुळाट ; संदेश पारकर विरुद्ध संदेश पारकर , काय आहे नेमकं प्रकरण
खारघर येथे झालेल्या प्रचार दरम्यान त्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन देखील केलं होतं. येत्या २० तारखेला कमळा समोरील बटन दाबून विकासाच्या दिशेने पाऊल उचलून पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्या असं प्रचार रॅलीत ठाकूर म्हणाले. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे.प्रचारा दरम्यान मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विजयाचे चित्र आत्ताच स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची भव्य प्रचार रॅली निघाली. खारघर गावातील चेरोबा मंदिरात दर्शन घेऊन खारघर शहरात प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर सेक्टर १२ मधील ब्लॉक, ए ते एफ ब्लॉक आणि शेवटी शिवमंदिर असा प्रचार करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील गेले तीन वर्ष पनवेल विधानसभेची उमेदवारी मिळवत भाजपाच्या प्रशांत ठाकूर सलग तीनवेळ विजयी झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीतही पनेवलकरांचा हाच विश्वास ठाकूर पुन्हा जिंकतील का हे येत्या निवडणुकांनंतर स्पष्ट होईल. विधानसभेची निवडणूक राज्याच्या राजकारणासाठी फार महत्त्वाची आहे. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या निवडणूकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार आणि कोणाचं पारडं जड होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.