सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन
सोलापूर : चांदण्याची छाया, कापराची काया माऊलीची माया होता, माझा भीमराया !! या काव्यपंक्तीप्रमाणेच कृतज्ञतेची भावना व्यक्त करत विविध सामाजिक संस्था, संघटना पक्ष आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन केले. अभिवादनासाठी जनसागर लोटला होता. विविध संस्थांच्या वतीने रक्तदान करून महामानवास आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प, पुष्पहार अर्पण करत मेणबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मनोभावे अबालवृद्धांनी अभिवादन केले. विविध पक्ष, सामाजिक संघटना, संस्था तसेच अधिकाऱ्यांकडून अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहरातील पार्क स्टेडियम जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि मिलिंद नगर येथील अस्थिविहार प्रेरणाभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. पुतळा परिसरात विविध संस्थांच्या वतीने रक्तदान करून महामानवास आदरांजली वाहण्यात आली.
ब्लड फॉर बाबासाहेब…!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ब्लड फॉर बाबासाहेब या घोषवाक्यानुसार सोलापूरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय शासकिय रक्तपेढीमार्फत हुतात्मा स्मृती मंदिर शेजारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. औदुंबर मस्के, डॉ. प्रदीप गाडगीळ, डॉ. स्वाती मुने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत रक्तदान करून अभिवादन केले.
समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव माजी जी. ओ. सी. आणि जेष्ठ सल्लागार अण्णासाहेब भालशंकर, महासचिव अनिल जगझाप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे सुचित्रा थोरे, ज्येष्ठ सैनिक विठ्ठल थोरे, अंगद जेटीथोर,माणिक आठवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
विविध संस्थांच्या वतीने रक्तदान करून अभिवादन
डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सोलापूर शासकीय रुग्णालय रक्तपेढी, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान ,भीमशक्ती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था व परिवर्तन सामाजिक संस्था यासह विविध संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.






