कुंभार्ली घाट बनलाय मृत्यूचा सापळा (फोटो -सोशल मीडिया)
कधी घाटात तर कधी खोल दरीत कोसळतात वाहने
सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक झाला पलटी
पावसाळ्यात घाट रस्त्याची दुरुस्तीच नाहीच
चिपळूण: गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. अवजड वाहतूकीची वाहने कधी घाटातील रस्त्यावर कोसळत आहेत तर कधी दरीत कोसळत आहेत. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे दुलर्क्ष करीत आहे. कुंभार्ली घाट रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडतो. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सातारा जिल्ह्यातील आहेत.
बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्याला जोडणाऱ्या घाट रस्त्याची अशी अवस्था सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावरही सरकारची खिल्ली उडवली जात आहे. कुंभार्ली घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात लागणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. कर्नाटकातील बेळगाव, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाणारी एसटीची वाहतूक याच घाटातून होते. येथील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अनेक कर्मचारी, अधिकारी याच घाटमार्गे जिल्ह्यात येतात. खेड, चिपळूण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधून तयार होणारे उत्पादन या घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात पाठवले जाते. सध्या आंबा घाटाचे काम सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षापासून बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बहुतांशी अवजड मालाची वाहने या घाट मार्गे जात आहेत.
सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक झाला पलटी
पावसाळ्यात घाट रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीच त्यामुळे पावसाचे चार महिने त्रासाचे गेले त्यानंतरही घाट रस्त्याच्या दुरुस्तीला बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. गेल्या आठवड्यात सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रक दरीत कोसळला. चालकाला खड्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे वळणावरून तो थेट दरीत गेला.
Chiplun: महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई; ज्वलंत प्रश्नावर राजकारण!
ट्रक बाजूला करताना वाहतूक कोंडीशी सामना
प्रचंड मोठ्या खड्यात आदळून किराणा मालाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हा ट्रक बाजूला करताना वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर मोटर वाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. घाटातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर बांधकाम विभागाने १५ कोटी रुपये खर्च केले आहे. गेल्यावर्षी या हॉट मिक्सने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर ही पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.






