संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज; तयारीही होतीये पूर्ण (फोटो सौजन्य: गुगल)
इंदापूर : शहरात येत असणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागताची तयारी पूर्णत्वास पोहोचली आहे. इंदापूर नगरपरिषद सज्ज स्वागतासाठी झाली आहे, अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी पत्रकारांना दिली.
मुख्याधिकारी ढगे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, प्रतिवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ही रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या अश्व रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली आहे. त्या ठिकाणी पालखी ठेवण्यासाठी मंडप व स्टेजची उभारणी करण्यत येत आहे. रिंगणाचे बॅरिकेटिंग करणेत आले आहे. पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येणाऱ्या भाविकांना रिंगण सोहळा पाहता यावा म्हणून डिजिटल स्क्रीनची सुविधा करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. पालखी कालावधीसाठी नगरपरिषदेकडून १० पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात येणार आहे. नगरपरिषदकडे असणारे अग्निशमन वाहन अहोरात्र पालखी सोहळ्यासोबत रहाणार आहे. त्यावर प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेमार्फत पालखी आगमनापासून प्रस्थानापर्यंत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अहोरात्र सेवासुविधा मिळावी यासाठी नगरपरिषदेने १० संवर्ग अधिकाऱ्यांची व नगरपरिषदेच्या ८० कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे, असे ढगे यांनी स्पष्ट केले.
पालखी मार्ग व शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, राडारोडा काढून स्वच्छता करण्याचे काम, अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील रिंगण सोहळा ते पालखी मुक्कामाचे ठिकाण, परतीचा मार्ग, शहरातील सर्व ठिकाणचे रस्ते, सर्व सार्वजनिक शौचालये, मोबाईल टॉयलेट दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे ढगे यांनी सांगितले.
स्वतंत्र स्नानगृह उभारली
पालखीसोबत येणाऱ्या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे. शहरातील १३ सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या कालावधीसाठी निर्मलवारी अंतर्गत अतिरिक्त १२०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्यात आले आहेत.