Indapur ZP Election 2026: भाजपचे सर्व दावे ठरले फोल; इंदापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती विजय
Indapur ZP Election 2026: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या राजकारणात दिलेली एकजूट आणि विश्वासाची दिशा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून ठळकपणे समोर आली आहे.
तालुक्यातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोन बलाढ्य, परंपरागत प्रतिस्पर्धी नेत्यांना एकत्र आणून अजितदादांनी उभी केलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जनतेने निर्विवादपणे मान्य केली आहे. निकालाने विरोधकांच्या सर्व दाव्यांना छेद देत राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर तालुक्यावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ८ आणि पंचायत समितीच्या १६ पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…
भाजपचा कोणताही उमेदवार विजयाच्या जवळपासही पोहोचू न शकल्याने हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान निमगाव केतकी व पळसदेव येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सभा झाल्या. यावेळी इंदापूर तालुक्यासाठी विशेष लक्ष देऊन विकासनिधी उपलब्ध करून देण्याची आश्वासने देण्यात आली होती. तसेच भाजपच्या सांगता सभांमध्ये आमदार सुरेश धस, आमदार राहुल कुल यांनी भरणे-पाटील यांच्या एकत्र येण्यावर टीका करत भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनीही या एकत्रिकरणावर भाष्य करत कार्यकत्यांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात जनतेने या सर्व प्रचाराला नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
या निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी बोरी गणातून मोठ्या फरकाने विजय मिळवला.
तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे सुपुत्र यशराज जगदाळे यांनी वडापुरी-माळवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी दणदणीत विजय मिळवला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे/यांनी बावडा-लुमेवाडी गटातून विक्रमी मताधिक्याने बाजी मारली.
याआधी इंदापूर नगरपरिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देत जनतेने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच मालिकेत आता पंचायत समितीही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
त्यामुळे हा निकाल केवळ निवडणूक विजय नसून, भरणे-पाटील यांच्या नेतृत्वावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने व्यक्त केलेल्या ठाम विश्वासाचा कौल असल्याचे स्पष्ट झाले आहे.






