फोटो - ट्वीटर एकनाथ शिंदे
मुंबई : आज देशभरामध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून येत आहे. झेंडावंदन करत 78 वा स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी ध्वजारोहण करत तिरंगाला अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी वर्षा बंगला अगदी तिरंग्याने न्हाऊन निघाला होता. यावेळी वर्षा बंगल्यावर काम करणाऱ्या सर्व पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी व पोलीस उपस्थित होते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. शासकीय इतमामात ध्वजारोहण पार पडले. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी ध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांचा केसरी फेटा घातलेल्या लूकची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झाले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार @DrSEShinde, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव @vikaskharage उपस्थित होते.… pic.twitter.com/MvIs24516c
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2024
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर हर घर तिरंगा साजरा करण्याचे आवाहन देखील केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज दिवस आनंदाचा, उत्साहाचा आणि विजयाचा दिवस आहे. हे स्वातंत्र ज्यांच्यामुळे मिळालं त्यांच्या ऋणातून आपली कधीही उतराई होऊ शकत नाही. आपल्या प्राणांची आहूती दिली, घरादारांवर तुळशीपत्र ठेवलं. त्या सर्व देशभक्त व स्वातंत्रवीरांना मी विनम्र अभिवादन करतो. सर्व जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जगभरातील सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो. तसेच 9 ते 15 ऑगस्ट हे हर घर तिरंगा अभियान राबवत आहोत. यामुळे प्रत्येकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे.
माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हफ्ते देखील लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. याची सुरुवात झाली असून याबाबत देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या लाडक्या बहीणांच्या खात्यांमध्ये दोन हफ्ते जमा झाले आहेत. कारण आम्ही निर्णय घेतला त्यावेळीच सांगितलं होत की रक्षाबंधनाच्या आधीच खात्यामध्ये पैसे येतील. तशी सुरुवात झाली आहे. 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे.