
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथे दाखल होतात. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यापूर्वी अनेक वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून हे पवित्र पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे नदीच्या प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक तसेच रासायनिक सांडपाणी आणि काही ठिकाणचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्यावर फेस तयार होत आहे. या फेसामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून जलचरांनाही त्याचा फटका बसत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी सायंकाळनंतर रात्रभर साबणाच्या पाण्याप्रमाणे फेसाने तरंगताना दिसत होती. ऐन वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रदूषणाची तातडीने दखल घेऊन नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. संबंधित उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून नदीचे प्रदूषण रोखावे, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक इंद्रायणी नदीत स्नान करणार असल्याने प्रशासनाने पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक असल्यास तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. इंद्रायणी नदी ही केवळ जलस्रोत नसून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठी प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवणे, बेकायदेशीर सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नदी संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.