मुंबई – दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना भारतीय चलनातील नोटा ओळखणे सोईस्कर होण्यासाठी कोणती साधने आणि कोणत्या पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो यासाठी तज्ज्ञांकडून सुचना मागवाव्यात, असे निर्देश सोमवारी मुबंई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले.
चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे उच्च न्यायालयाने आरबीआयला आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
तज्ञांच्या सूचना घ्या
नोटांमध्ये अनेक स्पर्शज्ञान देणारी वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत अशी माहिती मागील सुनावणीदरम्यान, रिसर्व्ह बँकेतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यावर नाणी आणि नोटांची रचना करण्यासाठी कोणते उपाय आणि पद्धत लागू करण्यात येऊ शकते याविषयी काही तज्ञांच्या सूचना घ्यावी, जेणेकरून ते पूर्णपणे किंवा अंशतः दृष्टीहीन व्यक्तींसाठी अनुकूल असतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. आम्ही याप्रकऱणावर आदेश देत राहू पण नोटांमधील आवश्यक बदलांविषयी आम्हाला मार्ग सापडणार नाही, त्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
दृष्टीहीन सर्व क्षेत्रात समना सहभागी
आम्ही कोणी धोरणकर्ते नाही. मात्र, दृष्टीहीन व्यक्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान सहभागी आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच याचिकाकर्त्यानी केलेल्या सूचना आरबीआयकडे मांडाव्यात असेही स्पष्ट करत खंडपीठाने सुनावणी चार आठवड्यांनंतर निश्चित केली.