शाही पराठ्याच्या माध्यमातून राजापूरचे नाव परराज्यांसह परदेशात पोहोचविणारे राजापूर तालुक्यातील डोंगर येथील उद्योजक सिराजुद्दीन साखरकर यांची सह्याद्री वाहीनीवरील हॅलो सह्याद्री या कार्यकमात शुकवार दि.1 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वा. ‘धरूया उद्योजकतेची कास’ या विषयावर मुलाखत सादर होणार आहे.
तालुक्यातील डोंगर साखरकर बेकरीचे मालक सिराजुद्दीन साखरकर यांनी शाही पराठा तसेच पुरी आणि पुरणपोळीच्या उत्पादनातून डोंगर गावचे पर्यायाने राजापूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत पोहचविले आहे. साखरकरांच्या या पराठ्याची भुरळ परदेशात राहणाऱ्यांनाही पडली आहे. अनेक जण जिथे मिळेल तेथून हे शाही पराठे, पुरी आणि पुरणपोळी परदेशात घेऊन जात आहेत. साखरकर बंधुंच्या या शाही पराठ्याच्या उत्पादनामुळे राजापूरची आणखी एक नवी ओळख उद्योग व्यवसायात निर्माण होत आहे.
सन 1998-99 साली साखरकर यांनी साखरकर बेकर्स या नावाने बेकरी उत्पादनाला सुरूवात केली. मात्र राजापूर शहर आणि तालुका परिसरात वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या आणि ध्यास घेतलेल्या साखरकर बंधूंनी दहा वर्षापुर्वी बेकरी व्यवसायातून या पराठा व्यवसायात पदार्पण केले. या व्यवसायाच्या माध्यमातून साखरकर यांनी डोंगर, गोवळ, विल्ये भागातील अनेक महिला व पुरूषांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अगदी यंत्राद्वारे पिठ मळण्यापासून ते पॅकिंग आणि आर्डर पाठविण्यापर्यंत सर्व कामे या महिला करत आहेत.
ग्रामीण भागात राहूनही उद्योग जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिराजुद्दीन साखरकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सह्याद्री वाहीनीवरील हॅलो सह्याद्री या कार्यकमात ‘धरूया उद्योजकतेची कास’ या विषयावर मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.