eknath khadase- Amit Shah- Raksha Khadase
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश गेल्या काही दिवसांपासून रखडला होता. पण खडसे आणि त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल खडसेंनी अमित शाहांना शुभेच्छा दिल्या. पण या भेटीमागे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
याबाबत, सुरुवातीला तर त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते. पण एका वृत्तवाहिनीशी बोलताना या भेटीवर भाष्य केले. ही भेट म्हणजे माझा भाजपमध्ये अनौपचारीक प्रवेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, अमित शाहांशी झालेल्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही खडसे आणि शाह यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
एकनाथ खडसेंनी 2019 मध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी भाजपला रामराम केला. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीलाही सोडचिठ्ठी दिली. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा भाजप प्रवेश रखडला होता. पण निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी अमित शाहांची भेट घेतली आणि अखेर त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, एकनाथ खडसेंनी जवळपास 40 वर्षे भाजपात वेगवेगळ्या पदांवर भाजपचे नेतृत्व केले. खान्देशात त्यांनी भाजप वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले. पण पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाला कंटाळून ते भाजपमधून बाहेर पडले. एकनाथ खडसे आता भाजपमध्ये आल्याने पुन्हा भाजपची ताकद वाढणार आहे.