राजापूर: राजापूर नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करुन बांधलेले मछीमार्केट असतानाही त्याचा वापर न करता अनेक मछीविक्रेते भर बाजारात मछी विक्री करत असल्याने राजापूर बाजारपेठेचा अक्षरश: मासळी बाजार झाला आहे . या मछीविक्रीमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीने नागरीक कासावीस झाले असले तरी याचे सोयर सुतक राजापूर नगर परिषदेला नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
काही वर्षापुर्वी मोठा गाजावाजा करत राजापूर नगर परिषदेने शहरातील बाजारपेठेच्या एका टोकाला लाखो रुपये खर्च करुन मछीमार्केटची इमारत उभी केली . त्याच्या श्रेयवादाचा फार मोठा गाजावाजाही तत्कालीन लोकप्रतिनिधीनी केला .मात्र आता ही इमारत या लोकप्रतिनिधींमुळेच शोभेची बाहुली बनली आहे . या रस्त्यावर बसणाऱ्या मच्छीविक्रेत्यांना याच लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संपुर्ण बाजारपेठेत हे मच्छीविक्रेते जागो जागी बसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . हे मछिविक्रेते मच्छीचे पाणी रस्त्यावरच टाकत असल्याने व जागोजागी दिवसभर हे मच्छीविक्रेते अस्वछता करत असल्याने नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
काही ठिकाणी तर हे मच्छीविक्रेते गटार लाइनच्या बाजुला व कचरा असणाऱ्या ठिकाणी बसत आहेत व तीच अस्वछ जागेतील मछी नागरिकांना खरेदी करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या मछिविक्रेत्याना आपल्या दुकानासमोर आश्रय द्यायला सुरुवात केल्याने सर्वसामान्य नागरिकानंमधुन नाराजीचा सुर उमटत आहे.बाजारपेठेत सातत्याने होणारे अतिक्रमण,आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर लावुन वाहतुकीला अडथळा करणारे व्यापारी, बाहेर आलेल्या झड्या व पायऱ्या यामुळे राजापूर बाजारपेठ बेशिस्त झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत .