
जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा
जत : जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवावे यासह विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी जत शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रकरणी दोन माजी आमदारांसह सुमारे ७० जणांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक, माजी सभापती, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, रासप आदी पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.४५ या वेळेत जत शहरातून जाणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ (ई) वरील महाराणा प्रताप चौकात हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लागू केलेल्या बंदी आदेशाचा भंग करून आंदोलन करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
आंदोलनादरम्यान सरकारविरोधात भाषणे करण्यात आली तसेच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका व ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Big Breaking: पुण्यात Cipla वर सर्जिकल स्ट्राइक; ‘या’ कारणांमुळे Tukaram Mundhe यांची कारवाई
या प्रकरणी माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, माजी सभापती सुरज उर्फ नाना शिंदे, तम्मणगौडा रवीपाटील, अमित उर्फ बंटी दुधाळ, निलेश बामणे, प्रकाश जमदाडे, युवराज निकम, रवींद्र सावंत, बाळ उर्फ अजिंक्य सावंत, राहुल बाबर, महादेव दुधाळ, प्रमोद सावंत, संतोष उर्फ साहेबराव कोळी, मन्सूर खतीब, इराण्णा निडोणी, परशुराम सांगोलकर, प्रकाश माने, बाबासाहेब कोडग, विवेक कोकरे, अप्पाराय बिराजदार, महांतेश पाटील आणि अजित पाटील यांच्यासह अंदाजे ४० ते ५० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१, १८९(२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५(३) तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घेरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.
मोठी बातमी! पुणे पोलिस आयुक्त Amitesh Kumar यांच्याविरुद्ध हायकोर्टात अवमान याचिका दाखल, कारण काय?