मेढा : जावली तालुक्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये कधीही लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. कारण गावामध्ये दुफळी नको, गाव एकसंघ राहावे, असे आम्हाला वाटत असायचे. निवडून येणाऱ्याचा आम्ही सत्कार करायचो. परंतु, सध्या निवडणुकीत हा पैलवान हारला तो पैलवान पडला, असे सांगताना काही जण दिसत असले तरी जेव्हा एकादा सामन्य कार्यकर्ता निवडून हातात घेतो आणि इतिहास घडवून दाखतो याचे चित्र मेढयासह १४ गावच्या सोसायटीच्या निवडणुकीच्या विजयाने दाखवून दिले आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांचे कौतुक करीत विजय मिळाला म्हणून आम्ही नाच्याचे काम करणार नाही, अशी खरबरीत टीका आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी केली.
एस एस पार्टे मंगल कार्यालयात मेढा सेवा सोसायटीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी जि प सदस्य व अर्थ, शिक्षण सभापती अमित कदम, एस एस पार्टे, विश्वनाथ धनावडे, एकनाथ ओंबळे, योगेश गोळे, विठ्ठलराव देशमुख, आनंदराव जुनघरे , बबनराव वारागडे, संजय गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ज्या पट्टयात उसाचे उत्पादन नाही त्या ठिकाणच्या जनतेने स्वाभिमान दाखवुन दिला. परंतु ज्या पट्टयामध्ये उसाचे उत्पादन आहे. त्या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर झाला. परंतु तेथील जनता जर दबावतंत्राच्या बाहेर गेली असती तर १०० टक्के स्वाभिमानाने इतिहास घडवेल, असा विश्वास यावेळी बोलून दाखविला.
ते पुढे म्हणाले, आम्ही कधी सुडाचे, द्वेषाचे राजकारण केले नाही. सदाभाऊ आणि आम्ही कितीही एकमेकांच्या विरोधात असलो तरी जावलीच्या विकासासाठी एकत्र येत असतो. आम्ही कधीही दहा वर्षात जावलीच्या राजकारणात लक्ष घातले नाही. फक्त मातीच्या लोकांची नाळ तुटली जाऊ नये म्हणून मी जिल्हा बँकेला निवडणूक लढवित होतो. असे सांगुन आता मात्र शंभर टक्के लक्ष घालू, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी यावेळी दिले.