जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
म्हसवड : म्हसवड पालिकेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञांमार्फत चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तहसीलदार मीना बाबर यांच्यामार्फत दिले. तर म्हसवड पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र शासनानेही भरघोस निधी दिल्याने या योजनेची केंद्रीय जल आयोगाकडुनही चौकशी करण्याचे आश्वासन माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिल्याने किशोर सोनवणे यांनी उपोषण गुरुवारी रात्री उशीरा मागे घेतले.
म्हसवड पाणी पुरवठा योजनेची श्वेतपत्रिका काढावी व निधीचा झालेला गैरवापर मुख्याधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी म्हसवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी बुधवार (दि.१९) पासून पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणाला सर्वसामान्य म्हसवडकर जनतेचा मोठा प्रतिसाद पहिल्याच दिवशी लाभल्याने आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली होती. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक राजकीय नेतेमंडळींनी या उपोषणस्थळी भेट देत सोनवणे यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
सोनवणे यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी सातारा यांना समजताच त्यांनी गुरुवारी तातडीने म्हसवडच्या तहसिलदार मीना बाबर यांना सातारा येथे बोलावून घेत आंदोलनाची माहिती घेतली. तर या आंदोलनाला भेट देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी म्हसवड येथे येत आंदोनकर्ते सोनवणे यांच्याशी चर्चा केली तर तहसिलदार बाबर यांच्याकडून प्रशासकीय माहिती घेत जिल्हाधिकारी पाटील यांच्या पत्राचे वाचन करुन सातारचे बापट यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी सोनवणे यांना याप्रकरणी आपण केंद्रीय जल आयोगाकडे तक्रार करण्याची सूचना करत आपण त्याचा नक्की पाठपुरवा करु, असे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते सोनवणे यांनी आपले उपोषण मागे घेतले, यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषणाची समाप्ती करत असल्याचे सोनवणे यांनी जाहीर केले.
चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग






