
किवळ - जोतिबा एसटी बससेवेचा शुभारंभ
मसूर : किवळ-ज्योतिबा बससेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. किवळ व परिसरातील गावांतील भाविकांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दर पौर्णिमेला ही बस सेवा सुरू राहणार आहे. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता तानाजीराव साळुंखे (माई) यांनी परिसरातील भाविकांच्या वतीने कराड आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती.
किवळ ते जोतिबा डोंगर या मार्गावर थेट वाहतूक सुविधा नव्हती. किवळ, कराड, कोल्हापूर, वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर अस टप्प्याटप्प्याने प्रवास भाविकांना करावा लागत होता. यामध्ये वेळ, आर्थिक भुरदंड, मनस्ताप सहन करावा लागत होता. बस सुरू करण्यासंदर्भात निवेदनाची तात्काळ दखल आगार प्रशासनाने घेतली व बस सेवा त्वरित सुरू केली.
दर पौर्णिमेला ही बससेवा सकाळी ठीक ७ वाजता किवळ बसस्थानकावरून सुटणार आहे. जोतिबा डोंगरावर पोहोचल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून बस दोन तास तेथे थांबणार आहे. बस शुभारंभ प्रसंगी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता साळुंखे माई, सरपंच प्रदीप काशीद, उपसरपंच सचिन साळुंखे, माजी उपसरपंच सुनील साळुंखे, मनीषा साळुंखे, सोसायटीचे माजी चेअरमन कृष्णत साळुंखे, माजी उपसरपंच सतीश साळुंखे, विष्णू पवार, संतोष साळुंखे, बाळासो साळुंखे, शशिकांत साळुंखे, पंकज साळुंखे, ओंकार सूर्यवंशी, हेमंत साळुंखे, योगेश साळुंखे, दत्तात्रय काशीद, शिवाजी माळी, अनिल पवार, लक्ष्मण गुरव, इंदुमती घाडगे यांच्यासह जोतिबाला जाणारे भाविक प्रवासी उपस्थित होते.
किवळ जोतिबा दृढ ऋणानुबंध
किवळ गावचे संत नावजीनाथ हे ज्योतिबाचे परमभक्त होते. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाच्या यात्रेत नावजीनाथांच्या सासनकाठीस मोठा मान असतो. संत नावजींनाथ प्रत्येक कार्तिक पौर्णिमेस जोतिबा किवळ गावी वास्तव्यास येतात, अशी श्रद्धा आहे. या पौर्णिमेस संत नावजीनाथांचा रथोत्सव असतो. जोतिबाच्या दक्षिणद्वारी, कापूर-अगरबत्ती लावली जाते. त्या पायरीजवळ नावजीनाथांचे स्थान व पादुका आजही भाविक भक्तिभावाने पूजतात.
भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत
किवळ व परिसरातील अनेक भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. अनेक भक्तगण दर पौर्णिमेला ज्योतिबाच्या दर्शनासाठी जातात. किवळ-ज्योतिबा प्रवास करतानाचा त्रास भाविकांना सोसावा लागत होता. आता किवळ ते जोतिबा डोंगर अशी बससेवा सुरू झाल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे.