"रतन टाटा बटाटा वडा सेंटर.... "; व्यायसायिकांनी दिली हटके मानवंदना, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने फक्त भारतच नाही तर विदेशात ही शोक व्यक्त करण्यात आला होता. रतन टाटा हे एक असं व्यक्तीमत्त्व होतं की करोडपती आणि सामान्य माणसांना देखील त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. टाटांच्या जाण्याने भारतीय उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. टाटा फक्त उद्योगपतीच नव्हते तर समाजासाठी देखील त्यांनी मोलाचं कार्य केलं होतं. कोविड काळात गरजूंना आणि डॉक्टरांना ताज हॉटेलमधून नाश्ता आणि कोरड्या खाऊचे पॅकेट्स जात असतं तेही मोफत. अशा या संवेदनशील उद्योगपतीच्या जाण्याने सामान्य गोरगरीब जनता देखील हळहळली.
सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांनी टाटांना श्रद्धांजली वाहिली तर कोणी रील्स करत कलेतून श्रद्धांजली वाहिली. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरमधील असल्याचं म्हटलं जातं. रतन टाटा हे प्रत्येक भारतीयांचं प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून हीच प्रेरणा घेत कोल्हापुरातले तरुण उद्योजक एकत्र येत टाटांना हटक्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. गंगावेश चौक या परिसरातील व्यापाऱ्यांनी आपआपल्या दुकानांच्या बाहेर रतन टाटांच्या नावाचा बोर्ड लावला आहे. जसं की, रतन टाटा बटाटे वडा सेंटर, रतन टाटा ज्युस सेंटर असं नाव देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. टाटांना मानवंदना देताना या प्रत्येकाच्या बोर्डवर असलेल्या मजकूराने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. बोर्डवर लिहिलं होतं की, “स्वर्गीय रतनजी टाटा यांना मानवंदना प्रीत्यर्थ”असा सामायिक मजकूर लिहिलेला होता. या मजकूराच्या पुढे प्रत्येकाच्या व्ययसायाचं नाव लिहिण्यात आलं होतं.
उद्योग जगतात टाटांनी भारतासाठी अमुलाग्र कार्य केलं आहे. याच जाणिवेतून संपूर्ण भारतीय आज त्यांना मानवंदना देत आहेत. जीवंतपणी नाही पण निदान त्यांच्या मृत्यूपश्चात तरी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी समस्त भारतीयांच्या वतीने करण्यात येत आहे. आज प्रत्येक होतकरु तरुणांना रतन टाटांच्या विचारांनी आणि त्यांच्या नम्र स्वभावाने प्रभावित केलं आहे. “करायला गेलं तर सगळं शक्य़ आहे. निर्णय कधीही चूक किंवा बरोबर नसतो. घेतलेला निर्णय योग्य कसा ठरेल हे आपण आपल्या कामातून सिद्ध करायचं असतं” असा करियरचा मूलमंत्र रतन टाटांनी देशाला दिला आहे. याच आदर्श उद्योगपतीला देशवासियांनी मानवंदना दिली आहे.