
Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच कोल्हापुरातील शाहूनगर परिसरात धक्कादायक घटना घडली. मानपान आणि आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादातून नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने थेट मंडपात रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. झटापटीदरम्यान रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला. सुदैवाने गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार शंकरराव पाटील यांना अटक केली असून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.
शाहूनगरमधील दत्त गल्ली येथे राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान संध्याकाळच्या आरतीसाठी मंडळातील कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून निमंत्रित केले जाते. यंदा सुधीर खेबुडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आरतीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने मंडळातील अंतर्गत वादाला तोंड फुटले.
मंगळवारी रात्री हा वाद मिटवण्यासाठी मंडळातील काही कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी सुधीर खेबुडे यांनी सिद्धेश थोरवत यांना त्यांच्या कुटुंबीयांना आरतीसाठी का बोलावले नाही, अशी विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांना मिळाल्यानंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. दरम्यान, खेबुडे यांच्यासह काही कार्यकर्ते बाजूला जाऊन थांबले होते. ते आपल्याबद्दलच बोलत असल्याचा गैरसमज झाल्याने पाटील संतापले.
संतापाच्या भरात विजयकुमार पाटील यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढली. त्यांना रोखण्यासाठी काही कार्यकर्ते धावत पुढे आले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हातातील रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला. गोळी जमिनीच्या दिशेने झाडली गेल्याने सुदैवाने कोणालाही लागली नाही. मात्र, गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने नवरात्रोत्सवाच्या मंडपात आणि परिसरात एकच धावपळ उडाली. ऐन उत्सवाच्या काळात मंडपातच गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा: ‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
घटनेनंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी आपापसात वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची शहानिशा करून गुन्हा दाखल केला. सुधीर दत्तात्रय खेबुडे (वय ३६, रा. शाहूनगर) यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विजयकुमार शंकरराव पाटील (वय ५९, रा. प्रतिभानगर, सध्या न्यू पॅलेस परिसर) यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी जप्त केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Ans: आरतीसाठी काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण न दिल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. याच वादातून गोळीबाराची घटना घडली.
Ans: झटापटीदरम्यान एक राऊंड फायर झाला. गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
Ans: पोलिसांनी पाटील यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे