इचलकरंजीचे राजकारण (फोटो-टीम नवराष्ट्र)
इचलकरंजी/ राजेंद्र पाटील: कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी कॉग्रेसची मोठी ताकद होती. आणि खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद वाढविण्याचे काम अनेक जेष्ठ नेत्यांनी केले होते. आजही जिल्ह्यात कॉग्रेसला झगडावे लागत आहे. केवळ सत्ता आणि पद यासाठीच नेत्यांनी आपले आस्तित्व कायम ठेवताना एकाही कार्यकर्त्याला संविधानीक पद पदरात पाडून दिलेच नाही. अगदी सहकारातील एखादा पुरस्कारही आपल्याच घरात यावा यासाठी त्याची ‘किंमत ‘ मोजण्याची तयारी देखील त्यांची असते. जिल्ह्यात वर्षानुवर्षे चाललेली खुर्चीची परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील आवाडे घराणे पुढे चालवित आहे.
खासदार पद जसे माने घराण्याकडे आहे तसेच आमदार पद देखील आवाडेंच्या घरातच रहावे यासाठीचा हा सगळा खटाटोप केला जातो आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर ज्याप्रमाणे आवाडे यांचा सातत्याने वरचष्मा राहिला. त्याचप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर आजपर्यंत स्व. बाळासाहेब माने यांच्या घराण्याची सत्ता राहिली आहे. सलग पाच लोकसभा निवडणूकीत स्व. बाळासाहेब माने हेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार होते. त्यानंतर त्यांच्या स्नुषा श्रीमती निवेदीता माने या दोन वेळा तर नातू धैर्यशील माने हेसुध्दा दोनवेळा खासदार झाले आहेत. स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतरही या मतदारसंघावर माने गटाची सातत्याने पकड राहिली आहे. परंतु या मतदारसंघाचा खासदार हा नेहमीच इचलकरंजी विधानसभेतील मताधिक्यावरच ठरला गेला आहे.
कै. दत्ताजीराव कदम यांच्या नंतर कै. बाळासाहेब माने , कल्लाप्पाणा आवाडे यांच्यासह आदींनी परिश्रम करून कॉग्रेसची ताकद वाढवली. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात खासदार दत्ताजीराव कदम अशी व्यक्ती होती की त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन काँग्रेस नेत्यांच्या वादात दोघांनाही दुखवायचे नाही म्हणून उमेदवारी नाकारली आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात १९७७ साली उमेदवारीची माळ बाळासाहेब माने यांच्या गळ्यात पडली. पहिल्याच निवडणुकीत ३३ हजार ४६४ इतके मताधिक्य घेत इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नोंद झाली. कदमअण्णा यांनी १९७८ साली स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवून कल्लाप्पाण्णा आवाडे यांना विधानसभेसाठी उभे केले.
बाळासाहेब माने सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. संपूर्ण जिल्ह्यात माने यांना मानणारा मोठा वर्ग होता. बाळासाहेब माने यांच्यानंतर १९९६ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना मिळाली. तर बाळासाहेब माने यांच्या स्नुषा श्रीमती निवेदीता माने या अपक्ष म्हणून रणांगणात उतरल्या. त्यामध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे विजयी झाले. त्यानंतर १९९८ च्या मध्यावती निवडणूकीतही काँग्रेसतर्फे आवाडे आणि शिवसेनेच्या वतीने निवेदीता माने अशी लढत होऊन आवाडे यांनी आपली जागा कायम राखली. परंतु त्यानंतर १९९९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या निवेदीता माने यांनी दोन पराभवांचा वचपा काढत आवाडे यांचा पराभव केला. तर २००४ च्या निवडणूकीत निवेदीता माने यांनी शिवसेनेचे संजय पाटील यांचा पराभव करत सलग दुसर्यांदा खासदारकी मिळविली. त्यानंतर २००९ च्या निवडणूकीत स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवेदीता माने यांना पराभूत करुन त्यांची हॅटट्रीक रोखली.
२०१४ च्या निवडणूकीत राजकीय समीकरणे बदलत गेल्याने शेट्टी यांच्या विरोधात माने यांच्या ऐवजी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र सलग दुसर्या विजयासह शेट्टी यांनी आवाडे यांना पराभूत केले. सन २०१९ च्या निवडणूकीत निवेदीता माने यांचे सुपूत्र व कै. बाळासाहेब माने यांचे नातू धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी मिळाली आणि युवा नेत्याने शेट्टींची हॅटट्रीक रोखतानाच आपल्या मातोश्रींच्या पराभवाचे उट्टे काढले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या निवडणूकीत महायुतीतर्फे शिवसेनेतून (शिंदे गट) लढलेल्या धैर्यशील माने यांनी सलग दुसर्यांदा खासदारकी राखत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांचा पराभव केला. तर दोन वेळा खासदारकी मिळविणार्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर अनामत जप्त होण्याची नामुष्की ओढविली. या दरम्यानच्या काळात सन २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्हीवेळा लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात उतरण्याची पुरेपुर तयारी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी केली होती.
दाेन्ही घराण्याचा वरचष्मा कायम
‘वेळेच्या आधी आणि नशिबात असल्याशिवाय काही मिळत नाही’ या उक्तीप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कै. बाळासाहेब माने यांच्या घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. तर लोकसभा नसली तरी डॉ. राहुल आवाडे यांना विधानसभेसाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघावर माने आणि विधानसभा मतदारसंघावर आवाडे घराण्याचा वरचष्मा कायम राहिलेला दिसून येतो.
तिसऱ्या पिढीचा वारसा परंपरा कायम !
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील माने-आवाडे घराणेचा राजकीय वारसा आज तिसरी पिढी चालवत असली तरी या दोन्ही घराण्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य मात्र सातत्याने दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी धैर्यशिल माने यांच्या विरोधात अर्ज दाखल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. महायुतीचे उमेदवार राहूल आवाडे यांच्या प्रचारात खासदार माने अद्याप सक्रीय नाहीत.