समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ (फोटो- ट्विटर)
कोल्हापूर: राज्यात लवकर विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. तसेच निवडणुकीसाठी अनेक इच्छुक देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच प्रत्यक्ष प्रचारसभा आणि अन्य गोष्टी सुरू झाल्या नसल्या तरी देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
कागलमधील लढाई हसन मुश्रीफ विरुद्ध समरर्जीतसिंह घाटगे अशी नसून धनशक्ती विरुद्ध स्वाभिमानी जनता यांच्यामध्ये आहे. या लढाईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद व स्वाभिमानी जनता यावेळी माझ्यासोबत आहे. पवारसाहेब यांच्यावर कागलच्या जनतेचे आजही प्रेम आहे. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी स्वार्थापोटी,पवार साहेब यांचेवरील निष्ठेचा सौदा केला आहे. यावेळी हा सौदा त्यांना खूप महागात पडणार आहे असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.
समरजित घाटगे पुढे म्हणाले, “स्व:स्वार्थापोटी पवारसाहेब याना अडचणीच्या वेळी सोडून मुश्रीफ साहेब यांनी मोठा धोका दिलेला आहे.याची त्यांना मोजावी लागेल? कागल मतदारसंघांमध्ये निवडणुकीआधीच पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे. जनतेची किंमत पैशात केली जात आहे. येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जाणार आहे. विरोधकांना पर राज्यातून पैसा येत आहे.अशी चर्चा आहे.त्यावर माझी करडी नजर आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी आणला म्हणणा-या पालकमंत्र्यांना इतर गटांची मदत घ्यावी लागते?.आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी का करावी लागते? मागील काही निवडणुकीत युवा पिढीला खोटे शब्द दिले.त्यामधे एका पिढीचे आयुष्य बरबाद झाले याला जबाबदार कोण? शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता तर मग आजपर्यंत किती गंगाराम कांबळे घडवले? याचा कागल गडहिंग्लज उत्तुर च्या जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.”
”माझ्यासह कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. माझ्या संस्कारानुसार त्यांना त्या भाषेत उत्तर देणार नाही. कारण मी काय केलेलेच नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाची. त्यांचा सारखा गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून निष्ठा विकून मी आलेलो नाही. त्यांना पाहिजे असेल तर मी माझ्या प्रॉपर्टीचे सर्व तपशील देतो.त्यांनी त्याची खुशाल तपासणी करावी. कारण त्यांच्यासारखे जमिनीचे व्यवहार करण्यासाठी मला पार्टनरची आवश्यकता भासत नाही. शेंडा पार्कातील अकराशे बेडच्या हॉस्पिटल व जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन साठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणणार म्हणत होते. पण ते आले नाहीत. कारण शहा साहेबांनाही माहित आहे की जो माणूस सर्व काही दिलेल्या शरद पवार साहेबांना फसवू शकतो तर तो आमचा तरी कसा होईल?” असा सवाल समरजित घाटगे यांनी उपस्थित केला आहे.