हिंगोली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज ६६ वा दिवस असूनमहाराष्ट्रातील यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळत असून विविध भागातील नागरिक यात सामील होत आहेत. ही यात्रा काल हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली असून आज सकाळी ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे. आज यात्रे दरम्यान राहुल गांधींचे कोल्हापुरी थाटात स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. कोल्हापूरवरुन दहा हजार नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवसात या यात्रेचा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे मोठे नेते सहभागी होत आहेत. काल आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींची भेट घेऊन ते देखील या यात्रेत सहभागी झाले होते. कोल्हापूरकरांकडून राहुल गांधी यांचे स्वागत होणार असून यावेळी त्यांना खास कोल्हापुरी कुस्ती पाहायला मिळणार आहे.