राहुल गांधींसह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी राज सिंह आमेराला कोटामधून अटक
कोटा: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून अटक केली आहे. राज सिंह आमेरा असे या आरोपीचे नाव असून, कोटा शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.
राज सिंह आमेरा याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांने राहुल गांधी आणि इतर २५ खासदारांना गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेत तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला ताब्यात घेतले. (Threatens)
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”
कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही
कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक (SP) तेजस्वनी गौतम यांनी या कारवाईनंतर एक सोशल मीडियावर एक संदेश दिला आहे. “कायदा सर्वांसाठी सर्वोच्च आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अशा प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून त्याने ही धमकी नेमक्या हेतूने दिली होती आणि यामागे कोणी चिथावणी दिली होती का, याचा तपास सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
व्हिडिओमध्ये राज सिंह अमेरा याने स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी म्हणून सांगितले आहे. पण करणी सेनेने मात्र आमेरा संघटनेचा सदस्य असल्याचे नाकारले आहे. ज्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती ते अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. आमेराने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पोस्ट करून ही धमकी दिली होती.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) टिका केली आहे. “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही तीच विषारी आरएसएस मानसिकता आहे जिने एकेकाळी नथुराम गोडसेला जन्म दिला होता. हे भाजप-आरएसएसच्या अतिरेकी वैचारिक अतिरेकीपणाचे एक मॉडेल आहे, जिथे मतभेद आणि विरोधकांना “राष्ट्रविरोधी” असे लेबल लावून वातावरण तयार केले जाते आणि शेवटी हिंसाचारासाठी जागा तयार केली जाते.”
ते पुढे म्हणाले, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानिक पदावर असलेले लाखो भारतीयांच्या हक्कांचा आणि न्यायाचा आवाज आहेत. परंतु ज्या अतिरेकी संघटनांनी त्यांना हत्येची धमकी दिली आणि कट रचला ते नेते आणि कार्यकर्ते मोकाट फिरत आहेत हे आश्चर्यकारक आहे. अशा लोकांवर कारवाई कधी होणार? भाजप-आरएसएसने कितीही विष पसरवले तरी हा देश गोडसेच्या विचारसरणीचा नाही तर गांधींच्या मार्गावर जाईल.”






