पाली : रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन देखील विस्तळीत झालं असून बाजारपेठ आणि रस्ते देखील जलमय होताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं विस्कळीत झालं आहे त्याप्रमाणेच याचा फटका वन्यजीवांना देखील बसत आहे. रविवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली आहे.
स्थानिक नागरिकानी ही मगर मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारील साठलेल्या पाण्याच्या डबक्यात दिसली होती . त्यानंतर स्थानिक नागरिकाने याबाबत वन्यजीव रक्षक शंतनू कुवेसकर यांना माहिती दिली. शंतनू कुवेसकर यांनी वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य यांना लागलीच ही माहिती दिली. वनविभाग व वन्यजीव रक्षक यांनी मगरीला रात्री 10 वाजता सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं आहे. या मगरीची लांबी साधारण चार फूट होती. मगरीच्या अंगावरून अज्ञात वाहन जाऊन मगरीला दुखापत झाली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते. तसेच पाठीमागचे दोन्ही पाय अधू झाले होते.
वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र तिला उपचाराची गरज होती. त्यामुळे मुख्यवनरक्षक प्रवीण एन. आर. यांनी या मगरीला पुढील उपचारासाठी पुणे येथे रेस्क्यू संस्थेकडे नेण्याची परवानगी दिली. त्यानुसार सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य पहाटे चार वाजता मगरीला घेऊन पुण्याला पोहोचले. सध्या रेस्क्यू संस्थेमध्ये मगरीवर उपचार सुरु आहेत.सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे येथील मगरी बाहेर येत आहेत. अशा प्रकारे मानवी वस्तीमध्ये कोणालाही मगर दिसल्यास तिला जवळून निरखून पाहण्यासाठी जाऊ नये. तत्काळ वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांना संपर्क करावा असे आवाहन सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सागर दहिंबेकर यांनी केले आहे.