Photo Credit : Socail Media
अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील पराभूत झाले. त्यांच्या पराभवानंतर सुजय विखेपाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती.त्यांची ही मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी १० जूनला मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुजय विखे यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीत काय निष्कर्ष येतो, याचे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्या चुरशीची लढत झाली. यात सुजय विखेंचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंत सुजय विखेंनी या निकालावर शंका घेत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे.
सुजय विखे यांनी मतदारसंघातील 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला. जिल्हा प्रशासनाने हा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. तिथून हा अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या अर्जाची दखल घेत अहमदनगरच्या जिल्हा निवडणूक शाखेला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे सुमारे 19 लाख रुपयांचे शुल्क भरले आहे.
सर्वात आधी ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तांत्रिक तपासणी करतील. विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मशीची मेमरी रिकामी केली जाईल. त्यानंतर मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाईल. एका मशीनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मते टाकता येतील. ही सर्व प्रक्रिया कॅमेराच्या राबवली जाणार आहे.