मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मागील काही महिन्यांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मस्जिदीवरील भोंग्यांवरही त्यांनी अनेक जाहीर भाषणात टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा देखील निश्चित झाला होता, मात्र उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी याला विरोध केला. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. मात्र आता राज ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती येत आहे.
राज ठाकरे यांना अयोध्येला बोलावण्यासाठी सोमवारी १० ऑक्टोबरला अयोध्येतील हनुमान गढी महंत राजुदास महाराज, महंत धरमदास आणि विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी मुंबई येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या महंतांनी राज यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
राज ठाकरे यांच्याशी आमची चांगली भेट झाली. विविध विषयांवर चर्चा झाली. आम्ही त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांआधीच मी अयोध्येला येणार होतो. पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही.पण मी आता येईल, असं राज ठाकरेंनी आश्वासन दिल्याचं महंत राजुदास महाराज यांनी सांगितलं.
मागच्या वेळी काही गैरसमज झाल्यामुळे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र यावेळी आंदोलन होणार नाही, सगळे गैरसमज दूर झाले आहेत. राज ठाकरे सनातन धर्माच्या पुढे जात आहेत. म्हणून त्यांना अयोध्येला बोलावायचं आहे, असं राज ठाकरे यांच्या भेटीला आलेल्या महंतांनी माध्यमांसमोर सांगितले.