Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 03.10.2026
Maharashtra to World Breaking News : विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलण्यात आली असून २०२५ च्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई खेळ २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या १७ वर्षीय कुमकुम मोहड हिने तिरंदाजी (Recurve Archery) प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून लॉस एंजिलीस २०२८ ऑलिम्पिकचा कोटा सुरक्षित केला.
राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून ‘ऑक्टोबर हीट’चा उकाडा वाढण्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य-पूर्वेतील तणावादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी G7 देशांनी १० कोटी बॅरल इंधन साठा बाजारात आणण्याची घोषणा केली. जागतिक घसरणीमुळे सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांना खरेदीचा मोठा दिलासा मिळाला आहे.
03 Oct 2026 10:00 AM (IST)
CJP Dadar Shivaji Park Rally: केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शक्तीप्रदर्शन करत भव्य आंदोलन छेडले. स्थानिक नागरिकांचा जोरदार विरोध आणि मुंबई पोलिसांची बंदी असतानाही अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात शेकडो तरुण व नागरिकांनी शुक्रवारी शिवाजी पार्कात एकत्र येत हुंकार भरला. मुंबईतील या आंदोलनानंतर सीजेपीने आता आपला मोर्चा दिल्लीकडे वळवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून आंदोलन केल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वकील सिद्धी देवळेकर यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
03 Oct 2026 09:58 AM (IST)
Nanded: नांदेडमध्ये आज सकाळी 9.44 वा. सेवालाल चौक, नमस्कार चौक, आनंदनगर, लातुर फाटा या भागात भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान अधिकृत माहिती अजूनही घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून करण्यात येते आहे.
नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (माहिती - रिपोर्टर सुनील जोशी, नांदेड)
03 Oct 2026 09:50 AM (IST)
India vs West Indies 3rd ODI Bench Strength Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथील मैदानावर रंगणार आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असल्याने अंतिम सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन बेंच स्ट्रेंथ अजमावण्याची शक्यता आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला एकदिवसीय संघात संधी दिली जाऊ शकते. यशस्वीने शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केल्यास त्याला मिळालेल्या संधीचे सोने करत आपली लय कायम ठेवता येईल, तर मधल्या फळीत विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर फलंदाजीची मुख्य धुरा असणार आहे.
03 Oct 2026 09:40 AM (IST)
Marathwada Graduates Constituency Polls: महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्याविरोधात प्रतापसिंह पाटील यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. या संभाव्य लढतीची पूर्वतयारी म्हणून प्रतापसिंह पाटील यांनी लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पदवीधरांच्या गाठीभेटी आणि प्रचार दौरे वेगाने सुरू केले आहेत. सलग तीन वेळा निवडून आलेल्या सतीश चव्हाणांसमोर नवे आव्हान उभे करण्यासाठी शरद पवार गटाने ही मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना मोठी धार आली आहे.
03 Oct 2026 09:30 AM (IST)
MVA MLC Election Controversy: राज्य विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या जाहीर झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) अंतर्गत नाराजी व मतभेद उफाळून आले आहेत. मित्रपक्षांशी कोणतीही पूर्वचर्चा न करता काँग्रेसने नागपूर पदवीधरमधून अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. आदिती पोहरे या तीन उमेदवारांची यादी एकतर्फी जाहीर केल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या राजकीय तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी आज शनिवारी दुपारी २ वाजता मुंबईतील हयात हॉटेल येथे मविआच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक पार पडणार आहे.






