Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 02.10.2026
Maharashtra to World Breaking News :
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेतील फेरफारविरोधात आज (2 ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होणार आहे.मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सीजेपीचे आंदोलन सुरू होत आहे.
ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, विशेष तीव्र फेरफार (SIR – Special Intensive Revision) अंतर्गत मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली नावे आणि ही प्रक्रिया थांबवावी. भविष्यातील निवडणूक आयुक्त नियुक्तीमध्ये नागरी समाजाच्या (civil society) सदस्यांचा सहभाग अनिवार्य करावा, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे.
महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी दिल्लीतील राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली असून देशभर ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
02 Oct 2026 09:50 AM (IST)
तिरुवनंतपुरम : केरळच्या गृह विभागाने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे दोन दशक जुन्या दक्षता तपासाच्या नोंदी मागवल्या आहेत. कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना २००६ मध्ये ही चौकशी सुरू झाली. हे प्रकरण केरळ राज्य परिवहन प्रकल्पांतर्गत एमसी रोडच्या बांधकामाशी संबंधित आहे. या प्रकल्पाशी संबंधित इंडो-मलेशियन कंपनी पाटी-बेलचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ली सी. बीन यांनी २००६ मध्ये क्वालालंपूरमध्ये आत्महत्या केली होती.
02 Oct 2026 09:40 AM (IST)
MPSC Drug Inspector Paper Leak Controversy: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या गंभीर गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः रात्रभर रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनात सहभाग घेतल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
02 Oct 2026 09:30 AM (IST)
janatar Mantar Protest: गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) आज दिल्लीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, युवक काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांनी पुकारले आहे. पण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. याचा अर्थ, जंतर मंतर आणि कनॉट प्लेस परिसरात गर्दी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
खरं तर, जंतर मंतर येथील आंदोलनाची घोषणा झाल्यापासून दिल्ली पोलिसांनी शांतता राखण्यासाठी आधीच व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील व्हीव्हीआयपी भागांमध्ये अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांसोबतच निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीभर हजारो जवान तैनात आहेत.
02 Oct 2026 09:23 AM (IST)
शिवाजी पार्क पाठोपाठ जंतरमंतरवरही विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशनची राष्ट्रीय अध्यक्षा नेहा वोरा यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नसली तरी हे आंदोलन होणारच असा निर्धार नेहा वोरा यांनी व्यक्त केला आहे.






