बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कणकवलीत मविआचे आंदोलन; काळ्या फिती बांधत सरकार विरोधात घोषणाबाजी
बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कणकवलीत महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधुन आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्यावतीने बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यात काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला.
हेदेखील वाचा- ‘नो मीन्स नो’, अल्पवयीन मुलीने नकार दिल्यानंतर वारंवार प्रेम व्यक्त करणं लैंगिक छळासमान; मुंबई हायकोर्टाचा निर्णय
सिंधुदुर्गातील कणकवली बुध्द विहार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधुन आंदोलन केल. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख अनंत पिळणकर, सचिन सावंत, महिला आघाडीप्रमुख निलम पालव सावंत, सिध्देश राणे , बाळू मेस्त्री, राजू राठोड, रिमेश चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे जी काही घटना झाली, त्या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करण्यासाठी काल महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं. आणि त्या निर्णयास संपुर्ण जनतेने पाठींबा दिला होता. परंतु सदावर्ते सरकारच्या बाजूने अनेकवेळा कोर्टात गेले, त्यामुळे 4 तासांत निर्णय देण्यात आला की, हा बंद संपुर्ण बेकायदेशीर आहे. म्हणून आम्ही तो बंद मागे घेतला. परंतु सगळीकडे उध्दव ठाकरे, शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काळ्या फिती बांधून आंदोलन करण्याचे ठरवले. या आंदोलनाला सर्व लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.
हेदेखील वाचा- लोको पायलटच्या केबिनमध्ये घुसून रील बनवणं पडलं महागात, नाशिकमधून 2 रीलस्टार अटकेत
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ केल्या जाणाऱ्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठींबा दिला. खरंतर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये. याआधी ज्या ज्या घटना घडल्या आहेत. कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी लोकांनी शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून आंदोलने केली आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुध्दा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी लोक तयार होते. मात्र, आंदोलन होणार हे लक्षात आल्यानंतर जिल्ह्यात 144 कलम लावण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे अत्याचारित महिला व मुलींना न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका बालिकेचा अपघात झाला असे दाखवून तीचे दफन करण्यात आले. मात्र, काल तो प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमागे कोण आहे? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत, असेही वैभव नाईक यांनी सांगितलं.
शिवसेना नेते सतीश सावंत म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना राज्यात वाढल्या आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून बेटी बचाओ ही चळवळ जिल्ह्यात उभी केली जाईल. या अत्याचाराच्या विरोधात संपुर्ण जनता संतप्त आहे. तर ठाकरे सेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितलं की, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. महायुती सरकारच्या काळात या होत असलेल्या घटनांमुळे जनमाणसात तीव्र भावना उमटत आहेत.