नाशिकमधून 2 रीलस्टार अटकेत (फोटो सौजन्य - Central Railway X account )
सध्या तरूणांमध्ये रिल्सची क्रेझ प्रचंड वाढली आहे. ट्रेनमध्ये, रस्त्यावर, भाजी मंडईत, गड, किल्ल्यांवर, गार्डनमध्ये, मॉल्समध्ये सगळीकडेच हल्लीची तरूण मंडळी रिल्स बनवताना दिसतात. फक्त तरूणांमध्येच नाही तर मोठ्या माणसांमध्ये देखील रिल्सची क्रेझ आहे. रिल्स बनवण्यासाठी ही तरूण मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात. सध्या सोशल मिडीयार तुम्ही असे प्रचंड व्हिडीओ पाहू शकतात, ज्यामध्ये तरूण मंडळी केवळ एका व्हिडीओसाठी आपला जीव देखील धोक्यात घालतात. आतापर्यंत अशा अनेक घटना देखील घडल्या आहेत, ज्यामध्ये रिल्स बनवताना अपघात झाले आहेत.
हेदेखील वाचा- वांद्रे रेक्लेमेशन मार्गावर स्टंट करणं बाईकर्सना पडलं भारी, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड
सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी रिल्स तयार करणं काहीवेळी जिवावर देखील बेतू शकतं. आतापर्यंत रिल्स तयार करणाऱ्या अनेक मंडळींना पोलिसांनी समज दिली आहे. रस्त्यावर, ट्रेनमध्ये किंवा गार्डनमध्ये तरूण मंडळी रिल्स तयार करतात, पण यामुळे इतरांना देखील त्रास होतो. यामुळे अशा मंडळींना पोलीस समज देतात, तर काहीवेळी त्यांच्याकडून दंड देखील वसूल करतात. पण तरिही रिल्स करणारी तरूण मंडळी मागे हटत नाही. आता अशीच घटना समोर आली आहे, ज्यामध्ये दोन तरूणांनी लोको पायलटच्या केबिनमध्ये घुसून रिल तयार केली आहे. पण ही रिल तयार करणं दोन्ही तरूणांना महागात पडलं आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कारवाई करण्यात आली आहे.
2 तरूणांना रील्स तयार करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. ठाण्यातील कसारा स्थानकात उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या चालकाच्या केबिनमध्ये अनधिकृतपणे घुसून रिल तयार करणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा दलाने नाशिकमधून अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (20) आणि रितेश हिरालाल जाधव (18) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही नाशिकचे रहिवासी आहेत. या दोघांनी लोकोपायलटच्या केबिनमध्ये अनधिकृतपणे घुसून रिल तयार केली आणि त्यांची ही रिल सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली. ही रिल व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या सुरक्षा दलाने दोन्ही तरूणांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा- 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक; वाशिमच्या मंगरुळपीर येथील घटना
मध्य रेल्वेने त्यांच्या X अकाऊंटवरून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. मध्य रेल्वेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तरूणांची रिल दाखवण्यात आली आहे. यासोबतच या तरूणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर दोघांनीही माफी मागितली आहे. मध्य रेल्वेने त्यांच्या X अकाऊंटवरून म्हटलं आहे की, नियम मोडू नका! कसारा स्थानकात मोटरमनच्या केबिनमध्ये विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली. लक्षात ठेवा, रील तयार करणे आपल्या जीवनावर कधीही बेतू नये. अशा कोणत्याही घटनांची तात्काळ 9004410735 किंवा 139 वर तक्रार करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेलसह दोन्ही आरोपींना नाशिक येथून 8 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते सोशल मीडियावर रिल करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये घुसले होते. दोघांवर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन चालकाच्या केबिनमध्ये प्रवेश करणे हे रेल्वेचे झिरो टॉलरेंस धोरण आहे.