संग्रहित फोटो
मुंबई : सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय सुप्रीम कोर्टात झाल्यानंतर, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे पुढच्या निवडणुकांपर्यंत स्थिर असल्याचं मानण्यात येतंय. शिवसेना पक्ष कुणाचा, प्रतोद कोण आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं निर्णयात स्पष्ट केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी 3 महिन्यांत निर्णय घ्यावा, शिंदे सरकार कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. अध्यक्षांना निर्णय लवकर व्हा, यासाठी निवेदनही देण्यात येणार आहे. तर दुसरीकडं घाईही करणार नाही आणि दिरंगाईही करणार नाही, असं सांगत राहुल नार्वेकरांनी निर्णय तातडीनं होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या सुरु झालेली आहे.
जेपी नड्डा यांच्यासोबत शिंदे-फडणवीसांची चर्चा
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीपर्यंत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यात त्यांनी निवडणुकांच्या कमाला लागण्याचे आदेश कार्यकर्ते, नेत्यांना दिले आहेत.
मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिका, 207 नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यात शिंदे गट आणि भाजपा पक्षाच्या नेत्यांना बळ देण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची गरज असल्याचं नड्डा यांना शिंदे- फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. नड्डा यांनीही विस्ताराला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं येत्या 10 ते 11 दिवसांत मे अखेरीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
कुणाकुणाला मिळणार मंत्रिपदं
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 20 जणांनाच मंत्रिपदं देण्यात आली आहेत. शिंदे गट आणि भाजपाचे अनेक जण उत्सुक असल्याचं सांगण्यात येतंय. तसचं दोन्ही बाजूंकडून एकाही महिलेचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. त्यामनुळं दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचं सांगण्यात येतंय.
भाजपात यांना संधी मिळणार का?
1. संजय कुटे
२. जयकुमार रावल
३. पंकजा मुंडे
४. माधुरी मिसाळ
५. किसन कथोरे
६. राणा जगजितसिंह पाटील
७. नितेश राणे
८. प्रशांत ठाकूर
९. योगेश सागर
शिंदे गटात ‘या’ नावांची चर्चा
१. संजय शिरसाट
२. योगेश कदम
३. भरत गोगावले
४. प्रकाश आबिटकर
५. बालाजी किणीकर
६. बच्चू कडू
नाराज आमदारांना महामंडळाचंही वाटप
ज्या आमदारांना मंत्रिपदं मिळणार नाहीत, अशा आमदारांना महामंडळ देण्यात येतील, असंही सांगण्यात येतंय. मुंबई महापालिका भाजपा-शिंदे गटासाठी महत्त्वाची आहे. सध्या मंगलप्रभात लोढा वगळता कोणत्याही आमदाराचा समावेश मंत्र्यांत करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत मुंबईतील मंत्र्यांची संख्या वाढवली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.