'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे...', माजी आमदाराकडून 17 लाखांची आर्थिक मदत
कल्याण : महाराष्ट्रात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावोगावी पाणी शिरल्याने शेतजमिनी, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी कल्याणकरांनीही सढळ हस्ते पुढाकार घेतला आहे.
कल्याण पश्चिमेतील सामाजिक संस्था, उद्योगपती व मान्यवरांनी मिळून तब्बल १७ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामध्ये कल्याणातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विकास वीरकर यांनी ११ लाख, श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट (अध्यक्ष गणेश खैरनार) यांच्याकडून ५ लाखांचा तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वैयक्तीकपणे १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत कल्याणातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून आज ही आर्थिक मदत करण्यात आली.
यंदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने अक्षरशः बळीराजाला उध्वस्त केले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बळीराजासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामध्ये कल्याणकारही कुठेही मागे नसून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने बांधकाम व्यावसायिक विरकर, श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांनी ही आर्थिक मदत केली आहे. ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले, “पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे. कल्याण पश्चिमेतील नागरिकांचे मोठ्या मनाने केलेले योगदान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.” तसेच कल्याणातील आणखी कोणत्या संस्थेला किंवा व्यक्तीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करायची असल्यास त्यांनी पुढे यावे, त्यांची मदत ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केली जाईल असे आवाहनही पवार यांनी पुन्हा केले आहे.