कल्याण : आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचा ताबा २३ वर्षे उलटल्यानंतर ही महापालिकेने घेतलं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अद्याप या सुसज्ज आरोग्य केंद्राचा ताबा घेण्यात आला नसून आरोग्य केंद्र धूळखात पडल्याचा आरोप शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केला आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य व्यवस्था व त्यांचे खर्च करते तर दुसरीकडे २३ वर्ष शहराच्या मध्यभागी असलेल्या या आरोग्य केंद्राचा ताबा अध्याप घेतला नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडे बेतुरकर पाडा परिसरात मनीषा नगर येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर आरोग्य केंद्राचे एक मजली इमारत उभारण्यात आली आहे. २००० साली ही इमारत उभारण्यात आली. मात्र अद्याप या आरोग्य केंद्राचा ताबा महापालिकेने घेतलेला नाही त्यामुळे हे आरोग्य केंद्र सध्या धुळखात पडून आहे. या आरोग्य केंद्रात गैरप्रकार होण्याची देखील शक्यता स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक मोहन उगले यांनी वर्तवली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे महापालिकेचे अनेक आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. तर काही आरक्षित भूखंडावर संबंधित आरक्षणाच्या इमारती उभे राहिल्या मात्र त्याचा ताबा अद्यापही महापालिकेने घेतलेला नसल्याचा आरोप मोहन ओगले यांनी केला आहे.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून आरोग्य सुविधांवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय तर दुसरीकडे आरोग्य केंद्राचे इमारतच दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी या इमारतीचा महापालिकेने तत्काळ ताबा घ्यावा व त्या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू करून नागरिकांना सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे.