बारामतीमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन
बारामती: शहरातील शारदा प्रांगण बारामती येथे आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांच्या मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने हरियाणा केसरी भोला ठाकूरला एकचाक डावावर चितपत करून विजय मिळवून पहिल्या क्रमांकाचे पाच लाखाचे पारितोषिक जिंकले.दुसऱ्या चित्तथरारक लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंजाब केसरी शेंडी कुमारला एकचाक डावावर चितपट करून विजय मिळवून पाच लाखाचे पारितोषिक जिंकले. तिसऱ्या लढतीत माऊली कोकाटेने हरियाणाचा आंतरराष्ट्रीय मल्ल आशिष हुड्डाला सवारी डाव घालून सिंगल निल्सन डावावर आस्मान दाखविले.
चौथी लढत जागतिक विजेता शिवा चव्हाण विरुद्ध सतपाल सोनटक्के यांच्यात झाली. या लढतीत शिवाजी चव्हाणने डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती करून सतपाल सोनटक्के वर विजय मिळविला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित बारामती तालुका कुस्ती संघ व युगेंद्र दादा पवार युवा मंच यांच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार रणजीतसिंह मोहिते- पाटील, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उद्योजक श्रीनिवास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड एस एन जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील , प्रवीण माने, उद्योजक उत्तम फडतरे, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड अशोक प्रभुणे, ॲड सुभाष ढोले, संदीप गुजर, सत्यव्रत काळे,पै रावसाहेब मगर आदि मान्यवरांसह राज्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कुस्ती स्पर्धेमध्ये वरील प्रमुख कुस्त्यांसह आखाड्यात एकूण दीडशे नामांकित कुस्त्या पार पडल्या. कुस्ती निवेदक पै धनाजी मदने व प्रा ज्ञानदेव बुरुंगले यांनी बहारदार समालोचन करून उपस्थितांची मने जिंकली तर प्रसिद्ध हलगी वादक राजू आवाळे यांनी आखाड्यात रंगत आणली. विजेत्या मल्लांना शरद पवार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले.
शरद पवार चिपळूण दौऱ्यावर
चिपळूण शहरात वशिष्ठ डेअरीकडून कृषी महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना शेतीची प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करता यावा तसंच शेतीविषय आणि दुग्धव्यवसाया संबंधित या कृषी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल? या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले.