दिवाळीत पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain Alert: राज्यासह देशभर मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जरी मॉन्सूनचे ढग आता दूर गेले असले तरी, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान विभागाने 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा दिला आहे. नवरात्री नंतर सुरू होणारी दिवाळीही पावसाच्या सावटाखाली जाऊ शकते, असे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये अलीकडेच पावसामुळे मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे हाताला आलेले पिक वाहून गेले असून, त्यांचा मोठा आर्थिक फटका झाला आहे.
Trump Tariff: ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा धमकी, काय होणार परिणाम
हवामान खात्याकडून देशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार, देशात पुढील सात दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग, नांदेड आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी जोरदार पाऊसही अपेक्षित आहे.
याशिवाय, पुढील काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगडमध्ये, तसेच 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. देशभरात धुमाकुळ घालून गेल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू केला होता. पण त्यानंतरही राज्यात पुन्हा पावसाचा अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. अंदमान समुद्र आणि आग्नेयेकडून बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने देशात पुन्हा मुसळधार पावसाचे सावट तयार झाले आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, 24 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यभर पावसाचे ढग राहतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामानाच्या या परिस्थितीमुळे, दिवाळीच्या सणाच्या काळातही लोकांना छत्र्या घेऊन फिरावे लागू शकते, असा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.