
अरे देवा! एकीकडे पारा 40 वर, तर दुसरीकडे वादळी पावसाचं संकट, 15 जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेची लाट असताना अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. आज, 9 मे रोजी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट घोंगावत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान तीव्र असणार आहे. तर उत्तर भारतातील एक सक्रिय चक्रीवादळ आणि नैऋत्य मध्य प्रदेशपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवार आणि रविवार रोजी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात हवामान सर्वाधिक अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ९ मे रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही हवामान बिघडले आहे. लातूर, धाराशीव आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत काही भागांमध्ये गारपिटीचे वादळही झाले असून, त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली येथेही ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असताना, कोकण किनारपट्टी आणि मुंबईतील लोकांना तीव्र उष्णता आणि दमटपणाचा त्रास होत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘यलो हीट अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवेतील दमटपणामुळे उष्णता असह्य होत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. बदलणारे हवामान आणि मेघगर्जनेचा धोका लक्षात घेता, नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा