सोलापुरात लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोराः
सोलापूर : सध्या सोलापूर विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध आहे. मुंबई-सोलापूरची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास स्टार एअरचे विमान मुंबईहून आले. ‘नई जिंदगी’ वस्तीच्या बाजूने विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या विंगमध्ये (पंख) पतंगाचा दोरा अडकला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे विमानाचे लँडिंग केल्याने मुंबईहून आलेल्या 34 प्रवाशांचा जीव वाचला. विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी परिसरातून पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले.
सोलापूर विमानतळावर ‘नई जिंदगी’कडील बाजूने सर्वच विमानांचे लँडिंग होते. तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेकऑफ होते. बुधवारी दुपारी नई जिंदगी भागात काही जण पतंग उडवत होते. त्याचवेळी विमान लँडिंग करत असताना पतंगाचा दोरा विमानाच्या विंगमध्ये अडकला. ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली. अचानक निर्माण झालेल्या समस्येवेळी न घाबरता किंवा गोंधळून न जाता वैमानिकाने सुरक्षितपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेदेखील वाचा : कराडच्या सैदापूर येथील चायनीज सेंटरला भीषण आग; 1.80 लाखाचे नुकसान, रात्री दुकान बंद केले अन् नंतर…
दरम्यान, बंदी असलेल्या नायलॉन मांजाची नई जिंदगी परिसरात विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेख (३४, रा. आनंद नगर १, मजरेवाडी) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिलाल शेखचे या भागात फारुख किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे विमान दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
मोठा अनर्थ टळला
दरम्यान, स्टार एअरच्या विमानाच्या विंगमध्ये लँडिंगवेळी पतंगाचा दोरा अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. हा दोरा इंजिनमध्ये अडकला असता तर मोठी घटना घडली असती, असे सोलापूर विमानतळाच्या व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले. बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






