भारतीय स्वयंपाकघरात दुधी भोपळा आपल्याला सहज उपलब्ध दिसेल. दुधी भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक दडलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. शिवाय यात पाण्याचे भरपूर प्रमाण आढळते जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. अनेकांना दुधीची भाजी खायला फार आवडत नाही अशात तुम्ही यापासून चविष्ट असे पदार्थ तयार करु शकता.
आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो दुधी, भाजी खायला आवडत नसेल तर त्यापासून बनवा हे 5 चविष्ट पदार्थ

दुधीचा हलवा - तुम्ही दुधीपासून गोड हलवा तयार करु शकता. यासाठी दुधी किसून त्यात दूध, साखर, वेलची पावडर आणि काही ड्रायफ्रुट्स घालून काही वेळ शिजवा आणि मग खाण्यासाठी सर्व्ह करा.

दुधी रायता - जेवणासोबत दुधीचा रायता सर्व्ह केला जाऊ शकतो. यासाठी किसलेला दुधा वाफवून घ्या आणि मग त्यात दही, जिरे पूड, मीठ घालून मिक्स करा. तुम्ही यावर हिंग, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा तडका देखील टाकू शकता.

दुधीचे थालिपीठ - सकाळच्या नाश्त्यासाठी हा परफेक्ट पर्याय आहे. यासाठी एका परातीत किसलेला दुधी, ज्वारी/बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ, आले-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, मसाला, हळद, जिरे, चिरलेली कोथिंबीर एकत्र करुन पीठ मळा आणि ओल्या कापडावर थालीपीठ थापून घ्या. तव्यावर तेल टाकून तयार थालिपीथ खरपूस भाजून घ्या आणि दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

दुधीचे कटलेट - कुरकुरीत आणि खमंग दुधीचे कटलेट सर्वांनाच आवडतील. यासाठी एका भांड्यात किसलेला दुधी, उकडलेला बटाटा, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर एकत्र करुन कटलेट तयार करा आणि मग त्यांना रव्यामध्ये घोळवून तव्यावर छान शॅलो फ्राय करा.

दुधी कोफ्ता - दुधी कोफ्ता तयार करण्यासाठी प्रथम दुधी किसून त्यात हिरव्या मिरच्या, आले, लाल मिरच्या, धणे, बेसन आणि मीठ घालून तेलात कोफ्ते तळून घ्या. आता कढईत तेल गरम करुन यात जिरे, हिंगाची फोडणी द्या. चिरलेला कांदा परता आणि मग यात टोमॅटोची प्यूरी घालून ती शिजली की मग हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ, तयार कोफ्ते आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी शिजवून घ्या.






