सौजन्य - सोशल मिडीया
सोलापूर : खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत. अन्यथा, त्यांना ५०० ते १५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.
महापालिकेचा परिवहन उपक्रम डबघाईला आल्यानंतर शहरात प्रवासी रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. रिक्षांच्या परमीटवर कोणाचेही निर्बंध नसल्याने दरमहा १०० ते १५० रिक्षा वाढत आहेत. सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सद्य:स्थितीस १२ हजार ६३० ॲटोरिक्षा आहेत. त्यांच्यासाठी मीटर बंधनकारक असून, आठ वर्षांपर्यंतच्या रिक्षांना दोन वर्षाला फिटनेस करून घ्यावा लागतो तर त्यानंतरच्या रिक्षांसाठी दरवर्षी फिटनेस पडताळणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक जुनाट रिक्षा रस्त्यांवर पाहायला मिळतात. फिटनेस नसलेल्या रिक्षांना चार हजार रुपयांचा दंड आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षा चालकास गणवेश बंधनकारक आहे. आरटीओ कार्यालयाने रिक्षा चालकांना ‘खाकी’चा पर्याय दिला आहे, पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशांपैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. आता ३१ जुलैपर्यंत किती रिक्षाचालक पोलिसांचे आदेश पाळतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
पाेलिसांनी ३१ जुलैपर्यंत दिली डेडलाईन
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी गणवेशाचे बंधन आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज १५ हजारांहून अधिक ॲटोरिक्षा धावतात, पण त्यातील ६० ते ७० टक्के चालक गणवेशाविनाच असतात. अशा रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक पोलिसांनी ३१ जुलैपर्यंत डेडलाईन दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदा कारवाई करताना संबंधित रिक्षाचालकास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल. एकदा दंड होऊनही त्याने ड्रेसकोडचे पालन न केल्यास पुन्हा प्रत्येक वेळी दीड हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना गणवेश शिलाई करून घ्यावाच लागणार आहे.
अनफिट ॲटोरिक्षा चालकांनी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढून घ्यावे, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, गणवेश (ड्रेसकोड) वापरावा, यासंबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत सर्वांनीच गणवेशाचा वापर करणे अपेक्षित असून त्यानंतर संबंधित ॲटोरिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
– सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर
असे आहेत गणवेशाचे तीन पर्याय
१) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट
२) खाकी पॅन्ट, खाकी पॅन्ट
३) खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट