
Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे.
सरकार जाणूनबुजून मराठा समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे कारण पुढे करून समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने या विषयावर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा करून टाकल्यामुळे आता माघार घेण्याचे प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून सातारा गॅझेटचा निर्णय अद्याप झालेला नाही. एका महिन्याच्या मुदतीत माहिती देण्याचे आश्वासन दिले होते, तरी दहा महिने उलटले तरी काहीच झाले नाही. गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव टाकला जातो, पण गुन्हे मागे घेतले जात नाहीत. मराठा-कुणबी एकच आहेत, असे वारंवार सांगितले जाते, तरीही एकत्रित जीआर काढला जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी किती वेळ लागणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१९६७ पासून सरकारने मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. समाजाचे नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल करत त्यांनी आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, कायदेशीर लढाई सर्व काही केल्याचे सांगितले. तरीही आरक्षण मिळाले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाची गरज असते का, असा खडा सवालही त्यांनी केला.
महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश पल्लोड यांची निवड