
eknath shinde
परभणी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात शिंदे भाषणासाठी उभे राहताच काही जणांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी झाल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ वातावरण लक्षवेधी बनलं.
घोषणाबाजी सुरू होताच एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका न घेता संबंधित आंदोलकांबाबत संयमाची भूमिका घेतली. ‘घोषणा देणारे आपलेच लोक आहेत,’ असं सांगत त्यांनी पोलिसांना त्यांना बाजूला थांबू देण्याची सूचना केली.
Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा
तसंच, संबंधितांना मंचावर बोलावण्यात यावं, अशा सूचनाही शिंदेंनी दिल्या. त्यामुळे घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमातील तणाव वाढू नये, यासाठी शिंदेंनी संवादाचा मार्ग स्वीकारल्याचं दिसून आलं.
यानंतर भाषणाला सुरुवात करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील विराट सभांची आठवण करून दिली. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
रक्षाबंधनाचा संदर्भ देत शिंदेंनी ‘लाडक्या बहिणींचा भाऊ’ ही ओळख आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, मात्र महाराष्ट्रातील बहिणींनी दिलेला हा स्नेह विशेष असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. शेतकरी संकटात असेल, तेव्हा सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, असं त्यांनी सांगितलं.
राज्याच्या तिजोरीवर शेतकरी, युवक आणि महिलांचा पहिला अधिकार असल्याचंही शिंदे म्हणाले. युवकांना रोजगार आणि शेतकऱ्यांना आवश्यक योजनांचा लाभ देण्यासाठी सरकार काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?
परभणीच्या राजकारणाचाही शिंदेंच्या भाषणात उल्लेख झाला. बंडू जाधव यांचं कौतुक करत त्यांनी ते डॅशिंग खासदार असल्याचं म्हटलं. परभणीच्या विकासासाठी मोठ्या निधीचा उल्लेख करत, या भागासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याची ग्वाही शिंदेंनी दिली.
विरोधी पक्षात राहून विकासकामांना अपेक्षित गती देता येत नाही, हे लक्षात आल्याने बंडू जाधव यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचंही शिंदे म्हणाले. दरम्यान, ‘डबल इंजिन सरकार विकासकामं केल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करत शिंदेंनी शेतकरी आणि युवकांसाठी सरकारच्या योजना पुढेही सुरू राहतील, असं स्पष्ट केलं.