मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली (संग्रहित फोटो)
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे झोपून आहेत. मात्र, मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे याठिकाणी तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, आणखी काही काळ मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु राहिल्यास त्यांची प्रकृती वेगाने ढासळू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शनिवारी मराठा आरक्षणासंबंधित समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. मात्र, जरांगेंसोबत त्यांची चर्चा यशस्वी ठरली नाही. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे आणि समितीला खरे अधिकार दिलेले नाहीत. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांचे काम शासन अध्यादेश (जीआर) जारी करणे नाही., असेही जरांगे पाटील यांनी म्हटले होते.
तिसऱ्या दिवशीही आंदोलनाला परवानगी
मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता तिसऱ्या दिवशीही परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
नियमानुसार आंदोलन व्हावे
मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच विधान केले आहे. त्यांनी ‘लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत. त्या नियमानुसार हे आंदोलन झाले, तर आम्हाला काही अडचण नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही’, असे म्हटले होते.