आंदोलन सोडून सरकारला सहकार्य करा...'; भाजप नेत्याचा जरांगे पाटलांना थेट इशारा
Keshav Upadhye Criticized Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते एकत्र आले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलनामुळे मुंबईवर छावणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच, न्यायालयाचे नियम पाळण्यात न आलेल्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण जरांगे पाटील यांनी मात्र मेलो तरी मुंबई सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. जरांगे यांच्या या भूमिकेवर भाजप नेते मनोज जरांगे यांना सरकारसोबत सहकार्य करण्याचा सल्ला दिला आहे.
“मराठा आंदोलन हे चिघळावं, दंगली घडाव्या यासाठी शक्ती कार्यरत…; शिवसेना नेत्याचा गंभीर दावा
“नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवून राज्य सरकारला सहकार्य करा, असा सल्ला केशव उपाध्ये यांनी दिला आहे. केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत जरांगेंना इशारा दिला आहे.”बस… आता थांबा जरांगेजी! ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही.
प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. म. गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यासमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे.
आता वेळ आहे थांबण्याची!.. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
Haveli Politics: निवडणुकीपूर्वीच हवेतील राजकारण रंगलं; इच्छुकांकडून स्वत:च्याच उमेदवारीची घोषणा
पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व कॅाग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!” असा इशारा केवश उपाध्ये यांनी दिला आहे.